साकेत ची पार्किंग समस्या.

साकेत ची पार्किंग समस्या.
---------------------------------------------------

दिवसेंदिवस साकेत मधील पार्किंग समस्या जटिल होत चालली आहे.
वार्षिक भाडे केवळ रू.१०००/-, बारा वर्षे झाली तरी कोणतीही योग्य व पारदर्शक पार्किंग धोरणाचा अभाव व इतकी वर्षे काही ठराविक मंडळीनी या मर्यादित ज़ागांवर कब्जा केला आहे ही उर्वरित लोकांच्या मनातील भावना, या सर्व गोष्टीमुळे लोकांच्यात असंतोष खदखदत आहे.
या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी त्वरीत एक सर्वसाधारण सभा बोलवून तोडगा काढला पाहिजे. 
मी हे किमान तीन वेळा आपल्याला लिहिले आहे. तरी आता जास्त वेळ न घालवता त्वरीत एक पार्किंग धोरण साकेत ने अवलंबले पाहिजे.

पार्किंगची नियमावली बनवताना..

*ही नियमावली लवचिक असली पाहिजे.

* ही नियमावली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना निश्चितपणे काही अधिकार प्रदान करणारी असली पाहिजे.

* या नियमावलीमध्ये सहकाराचे तत्त्व म्हणजे एक सदस्य-एक मत. याप्रमाणे एक सदस्य एक पार्किंग, हे अमलात आणण्याची तरतूद असणे आवश्यक आहे.

* एखाद्या सदस्यावर बहुमताच्या जोरावर जर काही अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण करण्यासाठी विशिष्ट तरतुदी असणे आवश्यक आहेत.

* पार्किंगच्या जागा कमी असतील व गाडय़ा/ सदस्य जास्त असतील तर कोणती पद्धत पार्किंग स्पेस देताना अवलंबावी याबाबत सुसूत्रता असणे गरजेचे आहे. तसेच त्याअनुसारच नियमावलीमध्ये तरतूद  असायला हवी.

* नियमावलीमध्ये एकाहून अधिक पद्धतींचा (पार्किंग अ‍ॅलॉट  करण्यासंबंधीचा समावेश असावा.

* जास्तीत जास्त किती पार्किंग चार्जेस लावता येतील (कमाल मर्यादा) याबाबतचे नियम नियमावलीत सामाविष्ट असावेत.

* पार्किंग स्पेस रोटेशनवर अ‍ॅलॉट केले असतील तर किती जास्तीत जास्त कालावधीपर्यंत हे अ‍ॅलॉटमेंट अस्तित्वात राहील याची मुदत या नियमावलीत दिलेली असावी.

* लिव्ह लायसन्सवर एखादी सदनिका दिलेली असेल आणि तिथे राहणाऱ्या व्यक्तीची गाडी असेल तर त्या व्यक्तीला पार्किंग शुल्क किती लावता येईल (जास्तीत जास्त) याची तरतूद असावी.

* एखाद्या सदस्याला एखादे पार्किंग अ‍ॅलॉट केले गेले, त्यानंतर ठराविक कालखंडासाठी त्याने आपली सदनिका लिव्ह लायसन्सवर भाडय़ाने दिली तर मालकाला पार्किंगही लिव्ह लायसन्स करारातील सदनिकेप्रमाणे पार्किंग (अ‍ॅलॉट झालेले) भाडेकरूला वापरण्यासाठी देता येईल की नाही, याबाबतच्या नियमांचा अंतर्भाव या नियमावलीत असावा.

* पार्किंग स्पेससाठी संस्था जागा देते त्यावेळी वाहन कुणाच्या नावावर असणे आवश्यक आहे हे नियमावलीत स्पष्ट होणे आवश्यक आहे.

* संस्थेच्या आवारात पार्क केले जाणारे वाहन हे कुणाच्या नावावर असलेले चालेल? कुटुंबातील सदस्याचे वाहन उभे करता येईल का? याचा खुलासादेखील या ठिकाणी होणे आवश्यक आहे.

* कुटुंबाची (पार्किंग संबंधीची) व्याख्या या नियमावलीत समाविष्ट करणे आवश्यक आहे.

* एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यालयाकडून दिलेले वाहन असेल तर त्यासंबंधीचे नियम यामध्ये समाविष्ट असले पाहिजेत.

* अशा वेळी कोणती कागदपत्रे संस्थेला सादर करावी लागतील याचा उल्लेख त्यामध्ये असला पाहिजे.

* बंद वाहन उभे करण्यासंबंधीचे नियम या नियमावलीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.

* वाहने स्टार्ट करणे, गेट बंद करणे, वाहन धुणे इ. संबंधीच्या तरतुदीही या नियमावलीत समाविष्ट होणे आवश्यक आहेत.

* पार्किंगसंबंधी सदस्यांमधील वाद न मिटल्यास त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागायची याबद्दलची माहिती या नियमावलीत असणे आवश्यक आहे.

* स्कूटर, मोटरसायकल, लहान गाडय़ा, मोठय़ा गाडय़ा यांच्या दरासंबंधीचे मार्गदर्शन या नियमावलीत असावे. उदा. त्यांचे दर, त्यांची जागा, त्यांची दुरुस्ती.

* भाडय़ाने द्यावयाची वाहने, स्वत: वापरायची वाहने (खाजगी आणि व्यावहारिक) याबाबतचे नियम उदा. पार्किंग चार्जेस, जागा इ.
मला आशा आहे की आपण या विषयावर एक कार्यकारी समिती ची बैठक लवकरच बोलवून योग्य ती पावले उचलाल.

आपला सहकार्येच्छूक,

दयानंद नेने
सदस्य, साकेत कार्यकारी समिती।

Comments

Popular posts from this blog

Code of Conduct for Repairs and Renovation of Members Flats in Saket CHSL.

Society cannot charge or demand money / donation for the Cultural/Festival Expenses from their members/residents.

Introduction to the concept of Antyodaya of Pandit Deendayal Upadhyay